उच्च शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम, देशात पाचवा क्रमांक; टोरोंटो विद्यापीठात निवड
बेळगावच्या तृप्ती देसाईची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक

बेलगाम प्राईड/ मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या हलशीवाडी, ता. खानापूर येथील कु.तृप्ती मल्लाप्पा देसाई हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत तिने कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक तर देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच जागतिक स्तरावर २१ वा क्रमांक मिळवत तिने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
तसेच तिने दोन महिन्यापूर्वी भारतात झालेल्या सेट या परीक्षेमध्ये देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे. तर कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. 35 लाख सहभागी विद्यार्थ्यांमध्ये तिने यश संपादन केलेले आहे. मागील 15 वर्षा नंतर तृप्ती ही कर्नाटक मधील पहिली मुलगी आहे जिने या परीक्षेमध्ये यश संपादन केलेले आहे.
कु. तृप्ती देसाई ही मराठी केंद्र शाळा, मच्छे या शाळेची माजी विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे शाळेचा आणि परिसराचा गौरव वाढला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेत ही परीक्षा विद्यार्थ्यांची अभ्यास व विचारक्षमता तपासण्यासाठी घेतली जाते. जगभरातील ४० हजारांहून अधिक महाविद्यालये व विद्यापीठे या परीक्षेच्या गुणांची दखल घेऊन प्रवेश ग्राह्य करतात. या उल्लेखनीय यशामुळे तृप्तीची कॅनडातील नामांकित University of Toronto येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. हे विद्यापीठ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असून कॅनडातील अव्वल विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
तृप्तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



