
सायबर स्कॅमर्स पासून सावध राहून आर्थिक नुकसान टाळा; पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेलगाम प्राईड/ आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहणे हा आपल्या सजगतेचा भाग आहे. कोणत्याही आमिषाला किंवा भीतीला बळी न पडता, ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहून आपली ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळावे,” असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले.
शनिवारी, २८ मार्च रोजी टिळकवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समर्थ्य मंदिर हॉल येथे ‘बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ’ आणि ‘बेळगाव शहर सायबर क्राईम विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘सायबर क्राईम जनजागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार, जसे की ओटीपी फ्रॉड, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती, लॉटरी स्कॅम आणि बनावट केवायसी अपडेट्स याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. त्यांनी सुरक्षिततेचे नियम सांगताना संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले. तसेच, पीएसआय सुमन पवार यांनीही तांत्रिक सुरक्षिततेबाबत ‘-नोट’ माहिती सादर करून ज्येष्ठांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मानद सचिव श्री. सुरेंद्र देसाई यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, तर एसीपी (सायबर क्राईम) मंतूर यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. यावेळी ‘मीडिया पॉवर प्रेस’चे संदीप देसाई यांनी पोलीस आयुक्तांचा विशेष सन्मान केला.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून पत्रकार प्रसाद प्रभू यांनी सायबर गुन्हेगारीची सद्यस्थिती आणि ज्येष्ठांनी घ्यायची खबरदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी एसीपी (सायबर क्राईम) मंतूर, सायबर क्राईम पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी आणि टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि समन्वय पीआरओ विकास कलघटगी यांनी केले. संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सायबर सुरक्षा आणि मोबाईल बँकिंगबाबत अनेक प्रश्न विचारले. पोलीस आयुक्तांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन ज्येष्ठांच्या शंकांचे पूर्णपणे निरसन केले. मानद सह-सचिव शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. यानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.




