संतोष सत्यनायक, राघवेंद्र हवालदार या अधिकाऱ्याना मुख्यमंत्री पदक जाहीर
जिल्ह्यातील सात जणांचा मुख्यमंत्री पदकामध्ये समावेश

बेलगाम प्राईड/ राज्यातील १५३ अधिकारी व पोलिसांना २०२५ सालासाठीचे मुख्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील सात अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे. मार्केटचे एसीपी संतोष दयानंद सत्यनायक व गुप्तचर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राघवेंद्र बी. हवालदार आदी अधिकाऱ्यांचा या यादीत समावेश आहे.
शुक्रवार दि. २७ मार्च रोजी राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी राज्य सरकारने अनुमोदित केलेले १५३ अधिकारी व पोलिसांच्या नावांचा समावेश असलेली यादी जाहीर केली आहे. शनिवारी पोलीस आयुक्तांनीही मुख्यमंत्र्यांचे पदक प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
मार्केटचे एसीपी संतोष दयानंद सत्यनायक यांनी आपल्या उपविभागात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच अनेक प्रकरणांचा यशस्वी तपास लावला आहे. बेळगाव, निपाणीसह अनेक ठिकाणी उत्तमरित्या त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे.
गुप्तचर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राघवेंद्र हवालदार यांनीही बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात उत्तमरित्या सेवा बजावली आहे. फिंगरप्रिंट विभागातील हवालदार बाहुबली ए. अनगाले यांचाही या यादीत समावेश आहे. एक हजारहून अधिक गुन्हेगारी प्रकरणांच्या घटनास्थळांना भेटी देऊन वैज्ञानिकरित्या १०८ हुन अधिक प्रकरणांचा छडा लावून ११८ राज्य व आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करण्यात त्यांची सेवा मदतीची ठरली आहे.
याबरोबरच ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक कुमार हडकर, डीसीआरई विभागाचे हवालदार सुनील विष्णू कांबळे, रायबाग पोलीस स्थानकातील पोलीस आरिफ मुदनाळ, खानापूर पोलीस स्थानकातील हवालदार जगदीश इराप्पा काद्रोळी यांनाही मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे. २ एप्रिल रोजी बेंगळूर येथे मुख्यमंत्री पदक वितरित करण्यात येणार आहेत.




