Uncategorized
Trending

गोव्याच्या मद्याची अवैध वाहतूक उघड; 3024 लिटर गोवा मद्यासह 55.28 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेलगाम प्राईड/ गोव्याहून कर्नाटकात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात बेळगाव दक्षिण जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईत 3,024 लिटर गोवा बनावटीचे मद्य आणि सहाचाकी वाहन असा एकूण 55 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, कारवाई दरम्यान वाहनचालकाने अधिकाऱ्यांना पाहताच वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

बेळगाव तालुक्यात महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील बाच्ची रस्त्यावर गस्त घालतेवेळी गोव्याच्या दिशेने चॉकलेटी रंगाचे टाटा कंपनीचे सहाचाकी वाहन (क्रमांक KA-20/AA-6449) येताना दिसला. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून घटनास्थळावरून पळ काढला.

अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता, मागील बाजूस असलेल्या कॅरिअरमध्ये सुरुवातीला माशांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या ट्रे आढळून आल्या. या ट्रेची तपासणी केली असता त्यामध्ये मद्याचे 110 बॉक्स आढळले. त्यानंतर ट्रे बाहेर काढून तपासणी केली असता त्यांच्या मागील बाजूस आणखी 240 बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

या सर्व बॉक्सची तपासणी केली असता 180 मिली क्षमतेच्या बिग बॉस ब्रँडीच्या एकूण 350 बॉक्समध्ये भरलेले 3,024 लिटर गोवा बनावटीचे मद्य आढळून आली. विक्रीच्या उद्देशाने हे मद्य बेकायदेशीररीत्या वाहतूक केले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत 35 लाख 28 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 20 लाख रुपये असून, एकूण 55 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ (केंद्र कार्यालय, बेळगाव), संयुक्त आयुक्त एफ. एच. चलवादी (बेळगाव विभाग) आणि बेळगाव दक्षिण जिल्ह्याचे उत्पादन शुल्क उपआयुक्त जगदीश एन. के. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!