
बेलगाम प्राईड पूणे/ राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात बुधवारी दुर्दैवी निधन झाले. सकाळी मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी निघताना विमान नलँडिंग होताना हा भीषण अपघात झाला. विमानाने पेट घेतल्याने ते जळून खाक झाले. यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा होरपळून अंत झाल्याने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या दौऱ्यासाठी आज सकाळी मुंबईहून विमानाने अजित पवार रवाना झाले. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान खुल्या जागेत कोसळून विमानाने भेट घेतली. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते. त्या सर्वाचा या अपघातात मृत्यू झाला.
राज्याच्या राजकारणात अजित पवार हे अजितदादा म्हणून ओळखले जात. आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे. अनेक वर्षे राज्याच्या अर्थ खात्याची धुरा त्यांनी सांभाळली. आतासुद्धा त्यांच्याच खांद्यावर अर्थखात्याची जबाबदारी होती. प्रशासनावर पकड असलेला नेता, बेधकडपणे बोलणारा नेता अशी त्यांची ओळख होती.
अजित पवार हे लोकनेते होते. बारामतीचे खासदार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला 1991 मध्ये सुरुवात केली. त्यानंतर बारामती विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला. नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार, अशी ही त्यांची ओळख होती. अलीकडेच काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होत त्यांनी राष्ट्रवादीची स्वतंत्र चूल मांडली होती. लोकसभेत त्यांच्या पक्षाला अपयश आले असले तरी विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. नगरपरिषद व महापालिका निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षाला काही भागांमध्ये चांगले यश मिळाले. आता जिल्हा परिषद निवडणुकांवर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची चांगली ताकद असल्याने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अजित पवार सक्रिय झाले होते. मात्र, प्रचारादरम्यानच काळाने त्यांच्यावर घाला घातला.




