
बेलगाम प्राईड/ बेळगाव लोकसभा सदस्य तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन, बेळगाव विमानतळावर स्वतंत्र टॅक्सी मार्ग उभारण्यासाठी सुमारे 16 एकर जमीन वायुदलाकडून हस्तांतरित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यानुसार सममूल्याची जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ओळखून देण्यास मान्यता दिली आहे; मात्र बेळगाव वायुदल याबाबत योग्य प्रतिसाद देत नसल्याने बेळगाव विमानतळ बंद होण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देण्याची विनंती करण्यात आली.
तसेच, बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्ड अधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या खासदारांच्या निदर्शनास न आणता GLR S.No 324-1 अंतर्गत सुमारे 6045 चौरस फूट जागा फुलांच्या बाजारासाठी भाडेपट्टीवर दिली असून हे बेकायदेशीर असल्याचे खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
बेळगाव शहरातील अशोकनगर येथे शासनाने हस्तांतरित केलेला फुलांचा बाजार आधीच कार्यरत आहे. शहरात दुसरा बाजार सुरू करण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी आवश्यक असताना, हा कायदा न पाळता कॅन्टोनमेंट अधिकाऱ्यांनी प्रस्तावित जागेत दुसरा फुलांचा बाजार सुरू करण्यास तसेच शेड उभारण्यास परवानगी दिली आहे,
हे बेकायदेशीर आहे. याविरोधात स्थानिक फुल विक्रेते व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. कॅन्टोनमेंट अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेताना खासदार/आमदार यांचे मत अनिवार्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच सध्या दिलेली परवानगी रद्द करण्याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती खासदारांनी मंत्र्यांकडे केली.
या सर्व विषयांसह इतर अनेक मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व बाबी ऐकल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले, असे माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा सदस्य श्री जगदीश शेट्टर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.




