
बेलगाम प्राईड/: येळ्ळूर परिसरातील रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी ‘अशोका बिल्डकॉन’च्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी गाठून तीव्र शब्दांत जाब विचारला. रस्त्याच्या संथ गतीचे काम आणि पावसामुळे चिखल-माती रस्त्यावर येऊन सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे.
पावसाळ्यात वाहनांच्या चाकांसोबत येणाऱ्या मातीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर घसरण तयार झाली आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे भीषण अपघात होत आहेत. अनेक वर्षांपासून काम सुरू असूनही कोणताही ठोस मार्ग काढण्यात आलेला नाही.
पावसामुळे रस्त्यावर पडणारा चिखल आणि माती यामुळे सातत्याने अपघात होत असून लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मागील रविवारी निसरडीमुळे घडलेल्या अपघातात तब्बल 21 लोक जखमी झाले असून, कामाच्या नियोजनातील त्रुटींमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अपघातानंतर कंपनीतर्फे तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची स्वच्छता आणि माती हटविण्यात आली होती पण तात्पुरत्या व्यवस्थेपेक्षा ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशा कडक शब्दांत कंपनीला इशारा देण्यात आला “जर येत्या काळात योग्य ते नियोजन करून रस्त्यावरील माती व अपघातांचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून काम पूर्णपणे बंद पाडतील,” असा थेट इशारा यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिला.
ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले की, “तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, या परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना केव्हा सांगणार? उद्या जर ग्रामस्थांचा उद्रेक झाला आणि गाड्यांचे नुकसान किंवा काम बंद पडले, तर त्याला संपूर्णपणे अशोका बिल्डकॉन प्रशासनच जबाबदार असेल.
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य सतीश कुगजी, सुभाष कंग्राळकर,दौलत पाटील,प्रकाश पाटील,पराग कानशिडे, अभिजीत देसूरकर परिसरातील स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




