Uncategorized
Trending

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खैरवाड येथे दुर्गामाता दौडची उत्साहात सांगता

बेलगाम प्राईड/खैरवाड : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खैरवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडची उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

दौडचा प्रारंभ दररोज पहाटे ५.३० वाजता शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना महाअभिषेक, आरती व पूजनाने होत होता. त्यानंतर गावातील विविध मंदिरांना भेटी देत दौड गावातील प्रत्येक गल्लीतून मार्गक्रमण करत होती. दररोज एका ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

दुर्गामाता दौडच्या अंतिम दिवसाचा शुभारंभ गुरव बंधूंच्या हस्ते ध्वजपूजन करून करण्यात आला. यावेळी खैरवाड गावातील प्रत्येक गल्लीत नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. विविध प्रकारचे देखावे, भगव्या पताका आणि फुलांच्या आकर्षक रांगोळ्यांनी संपूर्ण खैरवाड नगरी भगवेमय झाली होती.

यावेळी गुरव बंधू, भुजगुरव बंधू व कोलेकर बंधूंच्या वतीने सजीव देखावे सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व दुर्गामातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी कु. पुष्कर परशुराम कोलेकर याचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. पुष्कर सध्या इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असून, विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने अनेक ठिकाणी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या शैक्षणिक व स्पर्धात्मक कामगिरीची दखल घेत गावकऱ्यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी पुष्करने उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले. तो म्हणाला की, श्री दुर्गामाता दौड ही केवळ धार्मिक परंपरा नसून हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास, शौर्य, संस्कार आणि सामाजिक एकतेची प्रेरणा देणारा उपक्रम आहे. अशा उपक्रमांतून युवकांमध्ये धर्म-संस्कृतीविषयी आदर, संघटनभावना आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये अधिक दृढ होतात.

खैरवाड येथे ६ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्थापना करण्यात आली असून, तेव्हापासून आजपर्यंत दररोज सकाळी शिवस्मारकाची नित्य पूजा केली जात आहे. या माध्यमातून गावामध्ये शिवचरित्र, संस्कार व सामाजिक एकतेची परंपरा जपली जात आहे.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खैरवाडच्या सर्व धारकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी खैरवाड गावातील बंधू-भगिनी, महिलावर्ग, पदाधिकारी, मान्यवर, धारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी गुरव बंधूंच्या हस्ते सर्व उपस्थितांना नाश्ता देऊन दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा संघ, खैरवाड यांच्या वतीने या उत्सवात सहभागी झालेल्या खैरवाड गावातील सर्व लहान-थोर शिवसैनिक, धारकरी, महिला व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!