Uncategorized

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटतर्फे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

बेलगाम प्राईड/ ज्येष्ठ अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि प्रादेशिक सैन्यदलाचे (टेरिटोरियल आर्मी) मानद लेफ्टनंट कर्नल नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठा लाईट इन्फंट्री परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटतर्फे तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

नाना पाटेकर यांचे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या गाजलेल्या ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटासाठी त्यांनी बेळगाव येथे सलग तीन वर्षे कठोर लष्करी प्रशिक्षण घेतले होते. या चित्रपटात त्यांनी साकारलेली मेजर व्ही. एस. चव्हाण यांची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेतून त्यांनी मराठा सैनिकांचे शौर्य, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि अजिंक्य जिद्द प्रभावीपणे पडद्यावर साकारली. त्यांच्या या अविस्मरणीय भूमिकेमुळे मराठा सैनिकांच्या शौर्यपरंपरेला चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक ओळख मिळाली.

 

नाना पाटेकर यांचे रेजिमेंटशी असलेले नाते केवळ चित्रपटापुरते मर्यादित नव्हते. मराठा लाईट इन्फंट्री परिवारातील अधिकारी आणि जवानांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. रेजिमेंटच्या सदस्यांशी ते वैयक्तिक संपर्कातही राहिले. लष्करी जवानांबद्दलचा त्यांचा आदर आणि रेजिमेंटशी असलेली त्यांची आत्मीयता यामुळे त्यांचे या परिवाराशी असलेले नाते कायम दृढ राहिले.

१९९९ मधील कारगिल युद्धादरम्यान त्यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत राहून दिलेल्या सहकार्यानेही गणवेशाप्रती असलेला त्यांचा आदर आणि राष्ट्राप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली होती. मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल तसेच मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘प्रहार’ चित्रपटातील मेजर व्ही. एस. चव्हाण यांच्या भूमिकेतून मराठा सैनिकांचे शौर्य आणि रेजिमेंटची गौरवशाली परंपरा अजरामर करणारे नाना पाटेकर यांची आठवण रेजिमेंटला सदैव राहील. रेजिमेंट आणि त्यातील अधिकारी व जवानांशी त्यांनी जपलेले मैत्रीपूर्ण आणि आत्मीयतेचे संबंध हा त्यांचा अनमोल वारसा ठरेल,’ अशा भावना मराठा लाईट इन्फंट्री परिवाराने व्यक्त केल्या.

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार आणि मराठा लाईट इन्फंट्रीशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!