जातिवाचक शिवीगाळ व कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपातील ६७ वर्षीय आरोपीला सशर्त जामीन मंजूर

बेलगाम प्राईड/ जातिवाचक शिवीगाळ करून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ६७ वर्षीय आरोपीला बेळगाव येथील तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
वासुदेव रुद्राप्पा पाटील (वय ६७, रा. होनकल, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात नागू नेमाना मादार यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी नागू मादार हे होनकल गावात राहतात. त्यांच्या मालकीची गावात अडीच एकर शेती असून, या जमिनीत ते भात व उसाचे पीक घेतात. त्यांच्या शेताला लागूनच आरोपी वासुदेव पाटील यांचीही जमीन आहे.
दोन्ही शेतांमधून ये-जा करण्यासाठी असलेल्या पायवाटेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादातून २ जुलै २०२६ रोजी फिर्यादीची पत्नी शोभा आणि त्यांची पाहुणी जानकू रामचंद्र मादार या शेतातून जात असताना आरोपीने त्यांना आपल्या शेतातील पायवाटेवरून जाऊ नका, अशी ताकीद दिली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पायवाटेवरून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने दोघींना शिवीगाळ केली. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मोबाईलवरून मिळताच फिर्यादी नागू मादार तातडीने शेतावर पोहोचले. त्यानंतर जखमी महिलांना मोटारसायकलवरून प्रथम खानापूर येथील सरकारी रुग्णालयात आणि पुढील उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून खानापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी ३ जुलै २०२६ रोजी आरोपी वासुदेव पाटील याला अटक करून बेळगाव येथील तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली होती.
त्यानंतर आरोपीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला एक लाख रुपयांचा हमीदार व तितक्याच रकमेचे जामीनपत्र सादर करण्याची अट घातली. तसेच साक्षीदारांना धमकावू नये आणि यापुढे अशा प्रकारचा कोणताही गुन्हा करू नये, अशा अटी व शर्ती घालून त्याला सशर्त जामीन मंजूर केला.आरोपीच्या वतीने ॲड. मारुती कामाणाचे यांनी न्यायालयात बाजू मांडली.




